Friday, 6 February 2015

निनावी ते

"पिसू स्वतःला कुत्र्याची मेजवानी देण्याचं स्वप्नं पाहतात तर 'कुणीही नसलेले' ते दारिद्र्यातून निसटण्याचं…एक जादुई दिवस, आणि सुदैवं त्यांच्यावर अचानक मुसळधार पावसासारखं बरसणार आहे जणू - अगदी भांड्यातून खाली ओसंडावं इतकं…पण खरंच.. सुदैवं असं कधी-कुणावर बरसतं का???? अर्थातच नाही. काल, आज, उद्या - खरं तर कधीच नाही. हेच काय पण सुदैवं हे कधी पावसाच्या छोट-छोट्या थेंबाप्रमाणेही बरसत नाही, मग 'कुणीही नसलेल्या' त्यांनी कितीही आर्जव करू देत, मग त्यांचा डावा तळहात कितीही खाजू देत, किंवा दिवसाची सुरुवात त्यांनी आधी उजवा पाय उंबरठ्याबाहेर टाकून केलेली असू देत, अथवा नव्या वर्षाची सुरुवात नवीन झाडू विधिवत पुजन करून केलेली असू देत… 

'कुणीही नसलेले' ते : त्यांची मुलं-बाळं - कुठच्याही गोष्टीचे मालक नसलेले ते - निनावी - फसवून निनावीकतेच्या गर्तेत ढकलण्यात आलेले… सस्याप्रमाणे धडपडणारे, जिवंतपणीच मरणयातना भोगणारे ते…अपार उध्वस्तं झालेले ते… जे कुणीही नाहीत पण नक्कीच होऊ शकतात. जी भाषा नाही तर बोली बोलतात. ज्यांना धर्म नाही पण अंधश्रद्धा असतात. जी कला नाही तर कलाकृती बनवतात. संस्कृती नाही पण लोकसाहित्य साकारतात. जी माणसं तर कामगार म्हणवतात. ज्यांना चेहरा नाही तर कामासाठी फक्त हात असतात. जी नावानी नाही तर संखेने ओळखली जातात. ज्यांची नोंद जगाच्या इतिहासात नाही तर स्थानिक वृत्तपत्राच्या गुन्हेगारी सत्रात मिळते…निनावी ते - ज्यांची किंमत त्यांना यमसदनी धाडणाऱ्या बंदुकीच्या गोळीपेक्षाही तुच्छ मानली जाते…!!"

~ Eduardo Galeano 

No comments: