Friday, 5 September 2014

गुरु बिन कौन बतावे बाट

आज सगळीकडे शिक्षकदिनाच्या शुभेच्छांचा वर्षाव सुरु असताना अचानक बालपणीच्या एका गुरुजींची आठवण झाली. 'भोसले' त्यांचं आडनाव. आम्हाला ते हायस्कुलात गणित शिकवत. प्रथमदर्शनी रुक्ष आणि रागीट दिसणाऱ्या ह्या माणसात कमालीची आपुलकी नि शिक्षणाबद्दल तळमळ ठासून भरलेली होती. गृहपाठ करून न आणणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मनात तर ह्या व्यक्तीबद्दल प्रचंड भीती असे आणि 'भोसले सरांनी बोलावलंय' असा निरोप आला कि पोराची तारांबळ उडे. पण माझा त्यांच्याबाबतीत अनुभव फार वेगळा होता.

माझी शाळा गावापासून साधारण दोन मैल आणि हा प्रवास नेहमी पायीच करावा लागे. कित्येक वेळा हे अंतर मी भोसले सरांसोबत गप्पा मारत पूर्ण केलंय. ते माझ्या घराच्या अंगणात आले कि, "शैलेश, चल" अशी हाक देत आणि मी सुद्धा पटकन पायात माझी 'पैरेगोन' सरकवून - गळ्यात 'पाण्याची waterbag' (हसतो) अडकवत निघत असे. त्यावेळी सोबत चालताना चालू घडामोडींच्या चर्चेबरोबरच हास्य-विनोद करणारा आणि वर्गात गणितं सोडवून आणली नाहीत म्हणून कठोर शिक्षा करणारा व्यक्ती एकच का? असा प्रश्न कित्येकदा माझ्या बालमनाला पडे.

सातव्या वर्गात असताना मी राज्यशासन चालवीत असलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी apply केलेलं. माझ्यासोबत इतरही १५-२० विद्यार्थी होते. आणि आम्हा सगळ्यांची तयारी चांगली व्हावी म्हणून भोसले सर दररोज एक अभ्यासवर्ग घेत. परीक्षा काही दिवसांवर येउन ठेपली होती. मला त्यांनी आपल्या घरी बोलावून घेतलं. माझ्या हातात एक सराव प्रश्नपत्रिकेचं पुस्तक देत ते म्हणाले, "मला ठाऊक आहे इतर मुलं या परीक्षेविषयी फारशी सिरिअस नाहीत. पण तू ह्या पुस्तकाचा योग्य उपयोग करशील असं वाटतं. जा, खूप अभ्यास कर. मला तू गुणवत्ता यादीत आलेलं पहायचंय". यानंतर पुढच्याच आठवडयात हृदयविकाराच्या झटक्याने सरांचं निधन झालं. मी त्या परीक्षेत गुणवत्ता यादीत नाव मिळवलं खरं पण ते पाहायला माझे 'सर' या जगात नव्हते. मी मार्कलिस्ट घेऊन त्यांच्याघरासमोर २ मिनिटं घुटमळलो… पण त्या पायऱ्या चढून वर जायची हिम्मत नाही जमवू शकलो. आजही त्यांचे शब्द आणि हा संपूर्ण प्रसंग स्मृतीत खोलवर रुजून बसलाय.

त्यांना मी नेहमी सफेद कुर्ता आणि पायजमा ह्याच वेशात पाहिलंय. तेव्हा मनात सतत प्रश्न उभा राही, 'असं का बरं असेल?' पण मी कधी त्याबद्दल अधिक जाणून घेण्याची खटपट केली नाही. नंतर फार दिवसांनी कळलं कि पूर्वी D.Ed च्या अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांना असा Uniform असे. आपल्या महविद्यालयीन जीवनातल्या गणवेशाला आयुष्यभर अंगावर चढवून ज्ञानदान करणारे हे गुरु कुठे तर आजच्या जगात Monkey-wash slim-fit Jeans आणि डोळ्यावर काळा गॉगल घालणारा तो 'सर' कुठे !!!

त्यांच्या मृत्युनंतर त्याचे संपूर्ण कुटुंबीय परगावी निघून गेले ते कायमचेच. पण आजही जेव्हा गावी जातो; त्यांच्या घरासमोरून जाताना हा सगळा घटनाक्रम झरझर डोळ्यासमोरून गेल्यावाचून राहात नाही. एक क्षण वाटतं कि 'सर' नेहमीच्या सवयीप्रमाणे आपल्या ओटीवर बसलेले दिसतील का?? पण असं कधीही होत नाही.

आज 'भोसले सर' माझ्या सर्व शिक्षकव्रुंदांचे प्रतिनिधी आहेत. आजवर या आणि अजून कित्येक अशा शिक्षकांनी खूप काही शिकवलंय-घडवलंय. त्याबद्दल मी सदैव त्यांचा ऋणी असेल. माझ्यासाठी 'शिक्षक' हि एखादी औपचारिक परिभाषा किंवा व्याख्या नाही; 'शिक्षक' एक संकल्पना आहे - त्यात सतत काहीतरी देणं आहे; आपल्या सभोवताली शिक्षणाची आस जागृत ठेवणं आणि आपण जाणत असलेल्या  गोष्टी कुणाला तरी कामी येतील म्हणून त्या अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्नशील राहणं याहून 'शिक्षक' वेगळा नाही. आणि आपल्यातला प्रत्येक जण दैनंदिन जीवनात कमी-अधिक प्रमाणात का होईना हे करतच असतो. तेव्हा 'शिक्षकदिनाच्या तुम्हा सर्वाना मनःपूर्वक खूप खूप शुभेच्छा !!'

आपलाच
शैलेश